अर्थसंकल्प: विरोधकांच्या मते पुन्हा एकदा गाजर तर सत्ताधाऱ्यांच्या मते सर्वांगिण विकास साधणारा

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला.सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प शेती क्षेत्रासह राज्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे तर या अर्थसंकल्पातून राज्याच्या जनतेच्या हातात गाजराच्या पलीकडे काहीच मिळाल नाही अशी खरमरीत टीका विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी तरतूद केल्याने शेतक-याला न्याय देणारा, शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द असणारा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला थेट शासनाशी जोडणारा हा अर्थसंकल्प आहे- कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

या अर्थसंकल्पातून राज्याच्या जनतेच्या हातात गाजराच्या पलीकडे काहीच मिळाल नाही, भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनेतेच्या हातात पुन्हा एकदा गाजरच दिले आहे. अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेची घोर निराशा करणारा आहे- विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे

राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिली – विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

कोणतीही ठोस आकडेवारी न देता केवळ ‘पुरेशी’ तरतूद या शब्दाचा भडीमार करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘अर्थ’हीन असून भाजप सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे.- खा.अशोक चव्हाण

महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला अशा राज्यातील सर्वच घटकांना आनंदी, सुखी करणारा व चांगल्या भविष्याबद्दल आशा निर्माण करणारा हा अर्थसंकल्प असून सर्वच स्तरातील जनता याचे नक्कीच स्वागत करेल- चंद्रकांत पाटील – महसूलमंत्री

सरकारने मांडलेला अर्थसंकल्प दिशाहीन, जनतेची दिशाभूल करणारा आहे. आर्थिक पाहणी अहवालात मांडलेल्या गोष्टींचा अर्थमंत्र्यांनी खुलासा करणे गरजेचे होते. राज्याचा आर्थिक विकास दर किती असणार याचा उल्लेख नव्हता. राज्यातील सर्वच घटकांचा भ्रमनिरास झाला आहे.-राष्ट्रवादी