संत्र्याचा मिरकबहार हंगाम सुरू

पुणे : पिवळ्या, हिरव्या रंगाचे, गोड आंबट चवीच्या आणि आकाराने मोठ्या असलेल्या मिरकबहार संत्र्यांचा हंगाम सुरु झाला आहे. पंधरा दिवसांपासून या संत्र्याची आवक सुरू झाली आहे. आता आवकमध्ये वाढ झाली आहे. सुरूवातीला आंबट संत्र्याची आवक होती. मात्र, आता मागील तीन-चार दिवसांपासून गोड संत्र्यांची आवक होत आहे. ग्राहकाकडूनही या संत्र्याला मागणी आहे.

मार्केटयार्डात नगर जिल्ह्यातून या संत्र्याची आवक होत आहे. स्थानिक ग्राहकांसह गोवा, धारवाड, हुबळी येथूनही संत्र्याला मागणी आहे. पुण्यात ज्युसविक्रेते, स्टॉलधारकांकडून संत्रा खरेदी केला जात आहे. शेवटच्या टप्प्यात यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे संत्र्याची आवक ही दोन महिने सुरु राहील. तरीही उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होईल. सुरू असलेल्या भावामध्ये काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज संत्र्याचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी वर्तविला आहे.

सोमवारी येथील घाऊक बाजारात संत्र्याच्या तीन डझनास 100 ते 230 रुपये आणि चार डझनास 50 ते 100 रुपये असा भाव मिळाला असून मार्केटयार्डात तब्बल दहा टन इतकी आवक झाली. गेल्या आठवड्यात आवक अवघी दोन ते तीन टन होत होती. यंदा अमरावती परिसरात संत्र्याचे उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे नगर परिसरातील संत्र्यास चांगला भाव मिळेल .