देश बलवान होण्यासाठी सेंद्रिय अन्नधान्य खा – सिंधुताई सपकाळ

पुणे : चांगले सकस अन्न खाल्ले तरच देश बलवान होणार आहे. मात्र सध्या विषयुक्त अन्नामुळे अनेक आजारांनी देशाला ग्रासले आहे. त्यासाठी सेंद्रिय अन्न हाच त्यावरील उपाय असून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्य खा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी भीमथडी जत्रे अंतर्गत अन्नदाता-सेंद्रिय अन्न महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. या महोत्सवाचा गरीब शेतकरी बायकांच्या घरात दिवा पेटण्यासाठी नक्की उपयोग होईल, असेही त्या म्हणाल्या.

 पुण्यात चार दिवसीय भीमथडी जत्रेत वनराई, पूर्ण पुणे, वसुंधरा स्वच्छता अभियान, ग्रामगौरव प्रतिष्ठान, सस्टेनेबल लिव्हिंग स्टोअर आदींच्या संयुक्त प्रयत्नांतून अन्नदाता-सेंद्रिय अन्न महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अन्नदाता-सेंद्रिय अन्न महोत्सवात एकूण ४१ स्टॉल्स असून, त्यापैकी ३६ स्टॉल्सवर शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतमाल व अन्नधान्य विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर ५ स्टॉल्सवर सेंद्रिय घटक वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या महोत्सवात जनजागृतीपर प्रदर्शन, व्याख्याने, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे. भीमथडी जत्रेत सेंद्रिय अन्नपदार्थांचा प्रसार करणारा अशा प्रकारचा अन्न महोत्सव पहिल्यांदाच भरत आहे. हा अन्न महोत्सव चार दिवस सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार आहे.