सेंद्रीय खताच्या कांद्याला मिळाला चालू बाजारदराच्या दीडपट अधिक भाव

सोलापूर  – सलग तिसऱ्या वर्षीही झीरो बजेट नैसर्गिक शेतीतून कांदा पिकवून जादा दर मिळवण्याची किमया बीबीदारफळ येथील शेतकऱ्याने साधली. विषमुक्त शेतीमालासाठी निर्धारित सर्व चाचण्या पूर्ण केल्याने हैदराबाद येथील सेंद्रीय शेतीमाल विकणाऱ्या व्यापाऱ्याने हा कांदा खरेदी केला. विषमुक्त शेतीमालाला मागणी वाढत अाहे. अशा मालाला जादा दर देण्याची तयारी असल्याचे त्या व्यापाऱ्याने सांगितले.

सुभाष पाळेकर यांच्या झीरो बजेट नैसर्गिक शेतीची पद्धती अवलंबून शेतकरी नागेश ननवरे यांनी यावर्षीही कांदा पिकवला. गेली तीन वर्षे ते अशा प्रकारे रासायनिक खत मुक्त शेतीमालाचे उत्पादन करत आहेत. शेतीमाल पिकवण्यासाठी ते रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. ते जीवामृत, शेणकाला वापरतात. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र वापरतात.

यावर्षी त्यांना वीस गुंठे क्षेत्रात साडेतीन टन कांदा उत्पादन मिळाले. यंदा पावसाळा उशीरपर्यंत चालू राहिल्याने उत्पन्नात घट आल्याची खंत ननवरे यांनी बोलून दाखवली. त्यांनी पुणे येथील शासनमान्य प्रयोगशाळेत कांदा तपासून रासायनिक खत मुक्त असल्याचे प्रमाणपत्र मिळवले. हा कांदा हैदराबाद येथील व्यापाऱ्याने दीडपट जास्त भाव देत खरेदी केला.

प्रतिक्विंटल पाच हजार ५०० रुपये दरांनी विकला. त्या दिवशी प्रतिक्विटंल तीन हजार ५०० रुपये रूपये दर होता. ननवरे यांनी कांदा बियाणेही आपल्या शेतात तयार केले. लागवड, खुरपण, काढणी वगळता इतर खर्च नगण्य आहे. चाचणीसाठी पाच हजार रुपये खर्च आला. झीरो बजेटनैसर्गिक शेती पद्धतीने मला आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. यापूर्वी रासायनिक खते, कीडनाशकांवर खुप खर्च करावा लागायचा. शेतकऱ्यांनी भविष्याचा विचार करून नैसर्गिक शेतीची कास धरली पाहिजे.