शिवसेना मोदींना घाबरत असल्यानेच सत्तेतुन बाहेर पडत नाही : ओवेसी

हैदराबाद : शिवसेना वरपंगी कितीही आव आणत असली तरी आतून पंतप्रधान मोदींना घाबरते. त्यामुळेच शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याऐवजी सामनात अग्रलेख लिहिण्याचा नवा प्रयोग सुरू केल्याची टीका ऑल इंडिया इत्तेहादूल मुसलमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी केली. तसेच माझे पूर्वजही भारतीयच होते, हे मी सिद्ध करू शकतो,असं देखील ओवेसी यांनी म्हटलं आहे.

दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी खा. ओवेसी यांच्यावर चांगलीच आगपाखड केली होती . ओवेसी यांनी स्वत:ला हैदराबादपुरतेच मर्यादित ठेवावे. राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे, हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही! ओवेसी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या नावाखाली मुस्लिम समुदायाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. भविष्यात त्यांना याचा फटका बसेल’, असे विधान राऊत यांनी केले होते. दसरा मेळाव्यातील खा. संजय राऊत यांच्या या शाब्दिक हल्ल्याने संतापलेल्या ओवैसी यांनी शनिवारी यासंदर्भात ट्वीट करून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.