पंकजा मुंडेंच्या परळीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा

बीड: बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी २४ अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१५/१६ या आर्थिक वर्षात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता.

परळी तालुक्यात ३०७ कामांमध्ये कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन बोगस कामं केली. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर १८ कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं होतं. आता एकूण २४ कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले.

सदर घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी लावून धरली होती. तसेच कृषी आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार परळी तालुक्याचे कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. एकूण दोन कोटी ४७ हजार ६७२ रुपयांचा हा घोळ असल्याचं उघड झालं आहे.