कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करावे – राधाकृष्ण गमे

धुळे – युरोपातील अनेक देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन घोषित करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

आयुक्त श्री. गमे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना आजार निगडित प्रतिबंधाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक माणिक भोसले, उपायुक्त अर्जुन चिखले (रोहयो), अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) आदींसह विविध‍ विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त श्री. गमे म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना अभिनंदनीय आहेत. असे असले तरी गाफिल राहून चालणार नाही. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून अधिक बेडचे आतापासूनच नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवितानाच त्यांच्यात सातत्य ठेवावे. कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करावी. त्याचबरोबर रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने वापर करावा.

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या को-मॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांना आवश्यकता भासल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे. पोस्ट कोविड ओपीडी कार्यान्वित करावी. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी. त्यांच्याकडून दंड वसूल करावा. विक्रेत्यांनाही विना मास्क येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश देवू नये. तशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांनी विक्रेत्यांना द्याव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. मृत्यू दरही कमी झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात 100 बेड तयार करण्यात आले आहेत. त्याचा लाभ रुग्णांना होणार आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच नॉन कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक कार्यान्वित केला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे सांगितले.

आयुक्त श्री. शेख यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रतिबंधासाठी विक्रेते, फेरीवाले यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सेवेतील स्वच्छता कर्मचारी, आशा स्वयंसेविकांची चाचणी केली आहे. आता फेरीवाले, विक्रेत्यांची चाचणी घेण्यात येणार आहे, असे सांगितले. अधिष्ठाता डॉ. सापळे म्हणाल्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून उपाययोजना करण्यात येत असून वैद्यकीय महाविद्यालय सज्ज असल्याचे सांगितले.

महसुली वसुली वाढवावी

धुळे जिल्ह्यातून जमीन महसूल आणि गौणखनिज उत्खननापासून मिळणाऱ्या महसुलाची वसुली वाढवावी, असेही निर्देश आयुक्त श्री.गमे यांनी दिले. त्यांनी सांगितले, गौण खनिजाची शास्त्रीय पद्धतीने मोजणी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करावेत. आवश्यक तेथे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचा वापर झाला असेल, तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत मजुरांचे स्थलांतर रोखावे. वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. या अभियानांतर्गत देशी वाणाच्या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे.

पुरवठा विभागाने ग्राम आणि तालुकास्तरावर समित्यांचे गठण करावे. तसेच प्रत्येक तालुक्यातून किमान एक आदर्श स्वस्त धान्य दुकान तयार करावे. मतदार यादीतील त्रुटींची पूर्तता करावी. अधिकाधिक मतदारांच्या छायाचित्रांचा समावेश करीत छायाचित्र ओळखपत्रांचे वितरण करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, महसूल वसुलीसाठी नियोजन करण्यात आले असून गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके गठित करण्यात आले आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी निवडणूक, गोविंद दाणेज यांनी रोजगार हमी योजना, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी अन्नधान्य वितरण, श्रीमती सुरेखा चव्हाण, डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी भूसंपादनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी तहसीलदार, अपर तहसीलदार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –