प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक

मुंबई  – ज्या वस्तुंचा पुर्नवापर होतो त्यावर बंदी आणि ज्या वस्तुंचे रिसायकल होत नाही त्यावर बंदी नाही…सरकारची ही अभ्यासपूर्ण प्लास्टीक बंदी पर्यावरणाच्या रक्षणासाठी की पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की तोडपाणीसाठी असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजपवर केला.

सरकारने प्लास्टीक बंदी करताना अभ्यास केलेला नाही. हा निर्णय राजकीय फायदा होण्यासाठी आणि जनतेला अडचणीत आणण्यासाठी घेण्यात आला आहे. विदेशी कंपन्यांच्या दबावामुळे सरकारने रिसायकल वस्तूंवर बंदी आणली नाही. याचा अर्थ सरकारचा उद्देश आणि नियत साफ नव्हती असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी कँडी, माऊथ फ्रेशनर, लेस, बिस्किट पॉकेट, टूथपेस्ट यांच्या पॅकेजवर बंदी घालण्यात आली नाही. तर प्लास्टिक चमचा, ग्लास, कॅरी बॅग यांचा पुर्नवापर करण्यात येतो त्यावर बंदी घालण्यात आल्याचे सागंतानाच त्या वस्तुही पत्रकारांसमोर दाखवल्या.

ज्या वस्तुंचे रिसायकल होते आणि ज्या वस्तुंचे रिसायकल होत नाही अशासाठी सरकारने एक तज्ज्ञ समिती नेमावी जेणेकरुन पर्यावरणाचे रक्षण होईल आणि साडेचार लाख लोकांवर आलेली बेकारीची कुऱ्हाडही दुर होईल. त्यामुळे सरकारने तात्काळ या निर्णयाचा अभ्यासपूर्ण फेरविचार करावा आणि पर्यायी व्यवस्था निर्माण करावी आणि जोपर्यंत तज्ज्ञ समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत जनतेवर लादलेली दंडाची कारवाई थांबवावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

या पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो उपस्थित होते.

भाजप सरकारचा ४० हजार कोटींचा सिंचन घोटाळा; राष्ट्रवादीचा सनसनाटी आरोप