प्लास्टिक बंदी : मंत्रीमहोदयांनी खाल्ली कागदावरच झुणका-भाकर !

जळगाव :  राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू  केली आहे. प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो. जळगावमध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले होते. जेवणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचं ताट आणि चमचे आणले. पण महाजनांनी ते परत नेण्यास सांगत कागदी डिशमध्ये जेवण केलं. पाणी पिण्यासाठीही त्यांनी स्टीलचा ग्लास बोलवला.

राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू करण्यासाठी  काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने पुन्हा एकदा फेटाळून लावली. त्यामुळे राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी आलेली आहे.  सध्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अनेकांनी प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा धसका घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हा धसका घेतल्याचं पहायला मिळालं.