VIDEO- पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावनिक, मोदींना अश्रू अनावर

देशातल्या पोलिसांच्या कामगिरीला आपण नमन करत हुतात्मा झालेल्या पोलिसांचं बलिदान देश कायम स्मरणात ठेवेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या पोलीसांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारक आणि संग्रहालय देशाला समर्पित करताना बोलत होते. स्वातंत्र्यकाळापासून पोलिसांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं आहे. या स्मारकातील शिलाखंडावर हुतात्मा झालेल्या सर्व म्हणजे ३४ हजार ८ शे ४४ पोलीस कर्मचाऱ्यांची नावे कोरण्यात आली आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या पोलिसांच्या कामगिरी बद्दल बोलतांना भावनिक झाले होते. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चीनी सैनिकांकडून झालेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो.

आजाद हिंद सेनेच्या ७५ व्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ नवी दिल्ली इथं आज एका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फडकवण्यात आला. नेताजींच कार्य अभूतपूर्व होतं अशा शब्दात त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली. आपत्कालीन प्रसंगात काम करणाऱ्या वीरांसाठी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नावे एक सन्मान मोदी यांनी जाहीर केला आहे. दरवर्षी २३ जानेवारी रोजी हा सन्मान प्रदान करण्यात येईल.