देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलावली कॅबिनेट बैठक

पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.

देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. कोरोना साथीची सद्यस्थिती पाहता पंतप्रधान मोदी काही मोठ्या घोषणा करु शकतात असे म्हटलं जातंय. पंतप्रधान कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी सर्वंकष रणनीती राबविण्याची घोषणा करू शकतात. गेल्या एका दिवसात देशात 3,79,257 कोरोना केसेस नोंदवली गेली.

यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्यासोबत एक बैठक घेतली. ज्यामध्ये कोविड मॅनेजमेंटमध्ये सैन्याने उचललेली पावले आणि अन्य तयारीचा आढावा घेतला. सैन्याने आपले वैद्यकीय कर्मचारी राज्य सरकारांच्या सेवेत तैनात केले आहेत. त्याचबरोबर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू केली जात असल्याचे या दरम्यान सैन्य प्रमुख नरवणे यांनी पंतप्रधानांना सांगितले.

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जबाबदार धरलं असून गेल्या 10 ते 15 महिन्यांपासून तुम्ही काय करताय?, असा सवाल विचारत केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या भूमिकेवर उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का? या विषयावर कधी तज्ज्ञांशी चर्चा केली होती का?, असा सवालही मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मद्रास उच्च न्यायालयाने एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या –