आता विंचू-काट्याचे भय नाही राह्यले…

“मरणाचं भ्याव वाटायचं भाऊ, लई लोगं इंचू-काटा लागून जायच्ये, रात रात डोल्याला डोला लागायचा नाय… पन आता कसं भ्यावच संपलं…..” भिवंडी तालुक्यातील अकलोली जवळील वस्तीतील सीता माणिक मोरे मोठमोठे डोळे करून हे सांगत होती. तिच्या त्या डोळ्यातून आनंद मनसोक्त झिरपत होता.

सीता ही जवळच्या गावात जाऊन धुणी भांडी करणारी एक मध्यमवयीन महिला. तिच्यावरही तीन मुलांचा भार. घर तर दूरची गोष्ट राहिली, इथे दररोजच्या जेवणाची भ्रांत होती. त्यावेळेस कुणी मला सांगितलं असतं की तुझं हक्काचे घर होणार आहे तर मी त्याला वेड्यातच काढलं असतां असंही ती गदगदल्या स्वरात म्हणते.

पक्के घर नसल्याने कुडाची किंवा कारवीची झोपडी होती. वर्षातून दोन वेळेस तरी डागडुजी करावी लागे. सागाची पाने, गवत जंगलातून आणून भिंती तसेच छप्पर शाकारावे लागते. रानावनात झोपडी असल्याने साप, विंचू याचे खूप भय. घरात लहान मुलं, सासू. विशेषत: रात्री खूप सावध राहावे लागते. सासू आणि सीता दोघांनी आळीपाळीने जागायचे आणि काही सरपटणारे प्राणी, विंचू, इंगळी येत नाही ना, ते डोळ्यात तेल घालून पाहायचे. आयुष्य यातच चाललंय याची खंत सीताच्या मनात होती. सगळे जीवनच अस्थिर आणि बेभरवशाचे. घराचा प्रश्न येतोच कुठे ?

प्रधानमंत्री आवास योजना म्हणून एक योजना आहे आणि त्यात घर मिळू शकते असे कळूनही सीताने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. कारण घरासाठी कमीतकमी किती पैसे लागतात आणि आजन्म ते शक्य नाही ते तिला माहिती होते. पण एकदा सरपंच, विस्तार अधिकारी, यांनी सगळ्या ग्रामस्थांना एकत्र केले तेव्हा सीताही काही महिलांबरोबर गेली. प्रत्येकाला घर मिळेल, आणि कुठलेही कर्ज होणार नाही हा विश्वास या बैठकीत देण्यात आला, आणि थोडीशी पालवी फुटली.

दुसऱ्याच महिन्यात अंजूरला जाऊन अधिकाऱ्यांनी बँकेत खाते उघडायला लावले आणि मग काही टप्प्याटप्प्याने बँकेत 1 लाख 20 हजार रुपये जमा झाले. दरम्यान इतर गावकऱ्यांच्या मदतीने सीताने झोपडीच्या जागी पक्क्या घरासाठी बांधकामाला सुरुवात केली होती. तत्पूर्वी शौचालयासाठी देखील रक्कम मिळाली त्यात त्याचेही बांधकाम झाले होते.

आज सीताच्या हक्काच्या घरात तिला आणि तिच्या लेकरांना शांत झोप लागते. चांगली फरशी आणि भिंती आहेत. थोडेफार आवश्यक सामानसुमान व्यवस्थित लागले आहे. पाउस पाण्याची भीती राहिली नाही. सीता आता खऱ्या अर्थाने एका घराची मालकीण झाली आहे.

मासे साठविण्यासाठी १० हजार शीतपेट्या उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस