संकटकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्या

संकटकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्या संकट

नंदुरबार – कोरोना संकटकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून द्यावा. यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने विशेष प्रयत्न करावे,  असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. हिना गावीत, जि. प.अध्यक्ष सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक,  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड,  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, मनरेगाच्या माध्यमातून फळबाग लागवडीच्या कामाला गती द्यावी. आदिवासी माणसाला सक्षम करण्यासाठी फळबाग योजनेची माहिती दुर्गम भागातील शेतकऱ्यांना देण्यात यावी. बांधावर फळझाडे लावण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात यावे. या योजनेचा लाभ स्थलांतर रोखण्यासाठी होऊ शकेल.

बहुतांशी आदिवासी माणसाचे उत्पन्न निसर्गावर अवलंबून आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम  तातडीने सुरू करण्यात यावे आणि या गाळाचा उपयोग शेतीसाठी करण्यात यावा. नवीन पाझर तलावांच्या नव्या कामांचे नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावी. ‘ब्रीज कम बंधारा’ उपयुक्त ठरत असल्याने त्याचेही नियोजन व्हावे असे त्यांनी सांगितले.

बैठकीस कृषि, सामाजिक वनीकरण, वन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –