गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी २० कोटींची तरतूद – धनंजय मुंडे

मुंबई – ‘लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ’ अस्तित्वाच आल्यानंतर पहिल्यांदाच राज्य शासनाने 20 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पहिल्यांदाच २० कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांदरम्यान ही तरतूद करण्यात आलीय. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा झाली होती.

या निधीबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ते म्हणाले की,’ लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास भागभांडवल अंशदान म्हणून १० कोटी व सहाय्यक अनुदान म्हणून १० कोटी असे एकूण २० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आले आहेत. महामंडळाच्या माध्यमातून करावयाच्या विकास कार्याची ही सुरुवात आहे.

पहिल्यांदाच महामंडळाला २० कोटी रुपये आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगारांचे कल्याणकारी महामंडळ आणि त्यांच्या नावाने विविध योजनांची केवळ घोषणा केली जात होती. मात्र त्यांच्या भावनांचा केवळ राजकीय वापर होत होता. पण धनंजय मुंडे यांनी मात्र ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना अत्यंत कमी कालावधीत अस्तित्वात आणल्याने ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांच्या विविध संघटनांकडून धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –