लोकसहभागातून ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करावी – नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे

नाशिक – कोरोनाच्या संकट काळात ज्या ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आपल्या गावात होणार नाही, यासाठी गावपातळीवर सुरूवातीपासूनच प्रयत्न करण्यात आल्याने ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेत जिल्ह्याचे काम पथदर्शी ठरत आहे. ग्रामीण भागात लोकसहभागातून या स्पर्धेची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येवून अधिकाधिक गावे कोरोनामुक्त गाव स्पर्धेत सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कोरोनामुक्त गावांच्या आयोजित आढावा बैठकीत उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांच्यासह कोरोनामुक्त झालेल्या 11 ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या की, पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा सुरू केली. जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातून गावस्तरावरील लोकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती होऊन गावातील लोक त्यांच्यापातळीवरच कोरोनाचा शिरकाव गावात होऊ देणार नाहीत. तसेच ज्या गावांमध्ये काही प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतील तेथे सर्वेक्षण, वेळेत व योग्य उपचार, लोकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिने गावाचे निर्जतुकीकरण, सुरक्षित अंतर त्याचप्रमाणे ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या सहाय्याने गावात अंमलबजावणी करून आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी गावपातळीवर सर्वांच्या सहकार्यातून जिद्दीने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

दु:खाच्या काळात केलेल्या कामाचे स्मरण कायम स्वरूपी राहून त्यातून भविष्यात प्रेरणा मिळत असते. यामुळे कोरोनामुक्तीसाठी गावपातळीवर केलेले प्रयत्न व काम करतांना येणाऱ्या अनुभवांचा राज्यात सर्वांनाच फायदा होणार आहे. याकरिता कोरोनामुक्त गावांचे अनुभव यशकथांच्या स्वरूपात मांडून जिल्हा प्रशासनामार्फत एखादा विशेषांक प्रसिद्ध करण्यात यावा, असे ही डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी सूचित केले. झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांना त्यांनी यावेळी श्रद्धांजली अपर्ण केली.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या मोहिमांची माहिती देणाऱ्या प्रसिद्धी पत्रकांचे प्रकाशन मुख्यमंत्री यांच्याच हस्ते करण्यात आले. या मोहिमांची गावपातळीवर मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्ध करण्यात येवून गावकऱ्यांनी देखील या मोहिमांना सकारात्मकतेने प्रतिसाद दिला आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत करण्यात आलेल्या उपाययोजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येणारे नियोजन याबाबतची माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या की, तालुकानिहाय परिस्थिती वेगवेगळी असल्या करणाने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभाग प्रमुखाला तालुका संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच कोरोनामुक्त गाव राहण्यासाठी गावातील सरपंच व ग्रामसेवक यांच्यासोबत प्रत्यक्ष व ऑनलाईन स्वरूपात सातत्याने संपर्कात राहून गावातील परिस्थितीचा आढावा घेवून त्याबाबत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या मोहिमांअंतर्गत आशा वर्कस, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावातील लोकांचे सर्वेक्षण करून सर्वेक्षणात आढळलेल्या बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळण्यासाठी गृहविलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यासाठी गावातील शाळांमध्ये राहण्यासाठी लोकांनी पसंती दाखवल्याने शाळांमध्ये आवश्यक सुविध उपलब्घ करून देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे काही गावांमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिला.

महत्वाच्या बातम्या –