अतिवृष्टीग्रस्तांचे पंचनामे काटेकोरपणे करावेत – विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

औरंगाबाद – औरंगाबाद विभागातील अतिवृष्टीमुळे  ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असा एकही गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरीता विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेली जनावरे, घरांची पडझड, शेतीपिके नुकसानीचे पंचनामे काटेकोरपणे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित पुरग्रस्तांना मदत तसेच कोविड-19 बाबत आढावा बैठकीत श्री.वडेट्टीवार बोलत होते. बैठकीला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालनाचे जिल्हाधिकारी  विजय राठोड, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मिनीयार, रोहयो व समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासह दुरदृष्यप्रणीद्वारे मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत दिली जाईल, असे सांगून श्री.वडेट्टीवार म्हणाले की, पिक विम्याची मदत ही जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने करावी. त्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक घ्यावी.  त्याचबरोबर पुरात वाहून गेलेले पाळीव जनावरे, पिके, घरे, शेती आदींसंदर्भात मदतीकरीता संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वे करुन प्राधान्याने पंचनामे करावेत. या कामाकरीता थोडा वेळ लागला तरी चालेल; परंतु पंचनाम्याची कामे ही गुणवत्तापूर्वक करावीत जेणेकरुन एकही गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पाळीव जनावरे वाहून गेल्याचे पुराव्या अभावी पशुपालक मदतीपासून वंचित राहतात, यासाठी छापील शपथपत्राच्या आधारे माहिती जमा करून वंचितांना मदत द्यावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

कोविड-19 संदर्भात बोलतांना श्री. वडेट्टीवार म्हणाले की, कोविड-19  च्या निर्मूलनासाठी झालेल्या खर्चापोटी आवश्यक निधी जिल्ह्यांना वितरीत केला जाईल. बंजारा समाजातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच तांड्यावरील रस्ते तयार करण्याबाबत, जायकवाडी जवळील गावांचे पुनर्वसन आदींचे प्रस्ताव देखील जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाठवण्याच्या सूचना  श्री.वडेट्टीवार यांनी केल्या.

बैठकीच्या प्रारंभी विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी विभागात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेला खर्च, निधीची मागणी त्याचबरोबर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना प्राधान्याने  निधी देण्याची मागणी केली. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमध्ये झालेले पीक नुकसान, घरे, जनावरे, पाझर तलाव फुटुन झालेले नुकसान, पीक विमा, जिवितहानी आदी नुकसानीबाबत त्याचबरोबर कोविड-19 बाबत सविस्तर माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या –