रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता

रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता

यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे.

रब्बी कांदा क्षेत्रात १८ टक्के, तर उत्पादनात २० टक्के वाढीचे अनुमान असून, फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादन डोकेदुखी ठरणार असल्याचे कांदा खरेदी क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात. देशातील रब्बी कांद्याचे उत्पादन १८९ लाख टनापर्यंत वाढणार असल्याचे केंद्रीय फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे. यामुळे देशांतर्गत गरजेच्या तुलनेत कांद्याचा मोठा अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फलोत्पादन अनुमानात १९-२० हंगाम वर्षांत एकूण कांदा उत्पादन २४४ लाख टन अनुमानित आहे. त्यात खरीप आणि लेट खरीप मिळून ५५ लाख टन, तर रब्बीतून १८९ लाख टन अशी वर्गवारी आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात तसेच राज्यातील कांदा बाजारपेठेत आवक लक्षणीय होत आहे. तसेच देशातल्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे तेथील मागणी कमी झाली आहे.