राहुल गांधी तिकडे बँकॉकमध्ये जाऊन बसले आहेत, तिथे नक्की ते कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?

राहुल गांधी

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. आज या आंदोलनाचा सातवा दिवस आहे.

दिल्लीच्या वेशीवर थंडी, कोरोना सारख्या संकटात देखील शेतकरी आंदोलन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधील देव दीपावलीच्या सोहळ्यास हजर राहिले. त्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसने टीका केली होती. “शेतकरी वर्ग दिल्लीला आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत ते आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं करत आहेत. आणि पंतप्रधान मोदी मात्र तिकडे काशीमध्ये (वाराणसी) संगीताचा आनंद घेत मान डोलवत आहेत!”, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश सिंग यांनी केली होती.

काँग्रेसच्या या टीकेला भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “मोदीजी किमान काशीलाच गेले आहेत. मोदीजी बनारसला गेले तर विरोधकांना लगेच राग येतो. मोदीजी राहुल गांधींसारखे बँकॉकमध्ये तर गेलेले नाहीत. राहुल गांधी तिकडे बँकॉकमध्ये जाऊन बसले आहेत. तिथे नक्की ते कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?”, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, या आंदोलनावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात सुरु ठेवला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे शेतकरी आंदोलनावर भाष्य करून रोष व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली असून उद्या पुन्हा एकदा सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –