पावसाचा जोर वाढणार, येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस

पुणे : राज्यातील पावसाचे प्रमाण येत्या 2-3 दिवसांत पुन्हा एकदा वाढणार असून राज्यभर दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर येत्या 48 तासांत मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे.अजूनही दुष्काळी परिस्थिती असणार्‍या भागातील नागरिकांना ही दिलासा देणारी बातमी ठरणार आहे.

दरम्यान, कोकण, घाटमाथ्यावर रविवारी मुसळधार पाऊस कायम होता. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. मराठवाड्यात विशेष पावसाची नोंद झाली नाही.हवेच्या वरच्या थरातील चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा किनारपट्टीलगत स्थिर आहे. येत्या 24 तासांत त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची दाट शक्यता आहे, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. या स्थितीमुळे पुढील काही दिवसांत राज्यात सर्वदूर दमदार पाऊस पुन्हा एकदा बरसण्यास सुरूवात होणार असल्याचेही सांगण्यात आले.