अखेर राजू शेट्टींचा ‘स्वाभिमान’ जागला ; स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अखेर सत्तेला लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही राज्यात आजवर मोठ्या ताकदीने आंदोलने केली. पण व्यवस्थेविरोधात लढताना ताकद कमी पडत होती त्यामुळे भाकरी बदलने गरजेचे होते. त्यावेळी तळागळातील जाणते नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने एन डी ए मध्ये गेलो होतो. मुळात राजकारण करणे हा आमचा हेतू नाही.त्यामुळे आज घेतलेल्या निर्णयाने होणाऱ्या राजकीय फायदा – तोट्याचा विचार करत नाही. नरेंद्र मोदींनी हमिभावाच आश्वासन दिले होते. आश्वासन देणारा माणूस जबाबदार होता पण मोदींच आश्वासन मात्र हवेत उडाल.

शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. एकंदरीतच खासदार राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही कमालीचे नाराज होते.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला उत्तर दिले नव्हते.

Add Comment

Click here to post a comment