भाजपला मतदार लवकरच वनवासात पाठवतील : खा. राजू शेट्टी

कोल्हापूर : राजकारणात वेळ कधीही सांगून येत नाही. पण भाजप सरकारची कार्यपद्धती पाहता मतदार भाजपला लवकरच सत्तेवरून हटवून वनवासात पाठवतील, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. कोल्हापुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राजकारण हे कोणासाठी कधी फलदायी ठरेल आणि कोणाला कधी धक्का देर्इल, हे सांगता येत नाही. सध्या भाजपच्या नेत्यांना ‘अच्छे दिन’ आहेत, त्यामुळे त्यांची सत्ता आहे. पण ज्या प्रकारे भाजप सरकार कार्यरत आहे, त्यानुसार लवकरच मतदार त्यांना वनवासाला धाडतील, असे शेट्टी म्हणाले.

भाजपकडून सत्ता गेली की दुर्बीण लावून पाहिले तरीही त्यांना कोणी मित्र सापडणार नाही, अशी उपहासात्मक टीकाही शेट्टी यांनी केली.  या वेळी शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ‘पंतप्रधान मोदींनी आपले परदेश कमी करावेत आणि त्या ऐवजी एक सॅटलार्इट अवकाशात सोडावे. त्यामुळे कदाचित मोदींचा एखादा परदेश दौरा कमी होर्इल. पण शेतकऱ्यांना हवामानाची योग्य माहिती मिळेल’, असे शेट्टी म्हणाले.

तसेच, कर्जमाफीची शेतकरी सन्मान योजना ही ‘सन्मान योजना’ नसून ‘अपमान योजना’ आहे, असेही शेट्टी म्हणाले.