भंडारा जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा कारभार रामभरोसे

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय

भंडारा : संपूर्ण जिल्ह्याच्या कृषी विभागाचा कारभार पाहणारे अधीक्षक कृषी कार्यालयाचा कारभार रामभरोसे आहे. कृषी विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ साचलेले पाण्याचे डबके, तेथील आवारात उभी असलेली वाकडी तिकडी वाहने, कार्यालयात साचलेला फाईलींचा खच आणि पसरलेली धुळ असे हे सर्व चित्र गुरुवारी दुपारी २ वाजता दिसून आले. अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने विचारणा केली तर कृषीमंत्र्याच्या नागपूर बैठकीची तयारीत सर्व व्यस्त आहेत असे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.

भंडारा येथील खात रोडवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाशी जिल्हाभरातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा संबंध नेहमी येत असतो. कार्यालयात प्रवेश केल्यावर तेथील अव्यवस्थेचे दर्शन होते. कार्यालयाच्या फलक असलेल्या प्रवेशद्वाराजवळ पावसाने तळे साचले होते. तर प्रवेशद्वारातच बंद असलेले वाहन आणि दुचाकी अस्ताव्यस्त उभ्या होत्या. दुपारचे दोन वाजले होते तरीही कार्यालयाच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या.

या कार्यालयात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त ठेवलेल्या फाईली दिसत होत्या. तेथील स्वच्छतेबाबत विचारले असता कार्यालय रस्त्यावर असल्याने धुळ येणारच असे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. जिल्हा अधीक्षक अधिकारी कार्यालय असल्याने या ठिकाणी जिल्ह्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठकी होतात. परंतु त्या संदर्भात कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही.

तसेच येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक मिळत नसल्याची नेहमी ओरड असते. याउलट एका कर्मचाऱ्याने लाखनी तालुका कृषी अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय हे रामभरोसे असल्याचे दिसून आले.

महत्वाच्या बातम्या –

धनिकधार्जिणा व शेतकरी, मध्यमवर्गीयांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प! – अशोक चव्हाण

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट