एलईडी मासेमारी बंदी कायद्यात लोकप्रतिनिधी, स्थानिकांच्या सूचनांचा समावेश करण्याचे रामदास कदम यांचे निर्देश

Ramdas Kadam

कोकण सागरी हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन कायदा तयार करत आहे. त्यासाठी कोकण भागातील लोकप्रतिनिधी, मच्छिमार संघटना आणि स्थानिकांच्या सूचनांचा कायद्यात समावेश करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मत्स्यविकास आयुक्तांना दिले.

एलईडी मासेमारी बंदी कायद्यासंदर्भात श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. यावेळी श्री.कदम म्हणाले, एलईडी मासेमारी करणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारुन सोडले जायचे, त्यामुळे या मासेमारीला आळा घालणे अडचणीचे ठरत होते. अशा मासेमारीवर कारवाई करण्यासंदर्भात राज्य सरकारचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात नव्हता. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेऊन कारवाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

मात्र आता या एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार धोरण तयार करीत असून कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी सागरी भागातील जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधी, मच्छिमार संघटना आणि स्थानिकांच्या प्रत्यक्ष घेतलेल्या सूचनांचा समावेश या कायद्यात केला जाणार आहे. लवकरच या कायद्यासंदर्भातील अद्यादेश काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई आणि त्यांच्या बोटी जप्त करणे,एक लाख रुपये दंड आणि सहा महिन्याच्या शिक्षेसह मासेमारी परवाना रद्द करणे, स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, बारानॉटीकल मैल बाहेर जाणाऱ्या बोटींचा मागोवा घेणारी प्रणाली,एलईडी आणि जनरेटर किंवा अल्टनेटर आढळणाऱ्या बोटी जप्त करणे, एलईडी बोटीतून मासे घेवून येणाऱ्या बोटींवर कारवाई करणे, एलईडी बोटींना डिझेल पुरविणाऱ्या सोसायटींवर कारवाई करणे, एलईडी बनविणारे व विकणाऱ्यांवर कारवाई करणे, गस्ती नौका उपलब्ध करणे, खलाशांचे बायोमेट्रीक, एलईडी मासेमारीची व्याख्या आदी सूचनांचा समावेश करण्याचे निर्देशही श्री.कदम यांनी यावेळी दिले.

यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सद्यस्थितीत कोकण भागात मासेमारी बंद असली तरी ज्या बोटींना एलईडी व जनरेटर आहेत अशा उभ्या ठेवलेल्या बोटी जप्त करण्यात येतील, यासाठी मत्स्यविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीसबळ उपलब्ध करुन देण्यात येईल.

सागरी सुरक्षेसाठी सुरक्षा बोटी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून ३० नॉटीकल मैल क्षेत्राकरिता सहा नवीन बोटी खरेदी करण्यासाठी ५१ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. हा खर्च गृह आणि मत्स्य विभाग करणार आहे. शस्त्रसज्ज असलेल्या या बोटी सातही दिवस समुद्रात राहणार आहेत. अशा बोटी वापरणारे महाराष्ट्र राज्य पहिले ठरणार आहे. या बोटी पुढील तीन महिन्यात कार्यरत होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार सर्वश्री वैभव नाईक, अशोक पाटील, तुकाराम काते, मत्स्यविकास आयुक्त अरुण विधळे,सागरी सुरक्षाचे सहायक आयुक्त एस.एस.घोळवे आदी उपस्थित होते.

फिरत्या पशू चिकित्सालयामार्फत पशूंवर पाहिजे त्या ठिकाणी उपचार करणे शक्य – महादेव जानकर

अर्थसंकल्प : सरपंचाना येणार अच्छे दिन, मानधनात वाढ करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.