रेशन कार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन उपलब्ध होणार- जयकुमार रावल

jaykumar-rawal

रेशन कार्डधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्यास रास्तभाव दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा स्वरूपाचे परिपत्रक विभागाकडून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

ग्रामीण तसेच शहरी भागातील रेशनकार्ड धारकांना रास्तभाव दुकानदार महिन्यातील ठराविक वेळेनंतर रेशन उपलब्ध करून देत नाही. या संदर्भात  विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. तसेच विधानसभा सदस्यांनी याबाबतीत सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. याची दखल घेऊन याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतेच शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. यानुसार रास्त भाव दुकानदारांवर रेशनकार्ड धारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य (रेशन) उपलब्ध करून देण्याची जबादारी निश्चित करण्यात आली आहे, असे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले. रास्तभाव दुकानदाराने असे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त( पुरवठा), सर्व उपायुक्त (पुरवठा), सर्व जिल्हाधिकारी, शिधावाटप नियंत्रक,  संचालक (नागरी पुरवठा, मुंबई), सर्व जिल्हा पुरवठा आधिकारी यांना परिपत्रकाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.