स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची निवड

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील प्रमुख शेतकरी संघटना असलेल्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक चेहरा असलेले रविकांत तुपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमानाचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी तुपकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.

ऊस आंदोलन असो की शेतकऱ्यांचे इतर प्रश्न स्वाभिमानी शेतकरी पक्ष कायम रस्त्यावर उतरल्याच पाहायला मिळालं आहे. मात्र मध्यंतरी संघटनेत मोठी दुफळी पडली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असणारे सदाभाऊ खोत यांनी राज्यातील मंत्रीमंडळात स्थान मिळताच पक्षाशी फारकत घेतली.

सदभाऊंच्या बंडामुळे निर्माण झालेल्या यादवी परिस्थितीत त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे शेतकरी पक्षाला असणाऱ्या फुटची परंपरा स्वाभिमानीमध्ये देखील दिसून आली. मात्र हे सर्व होत असताना युवा चेहरा असणारे रविकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देत खासदार शेट्टींच्या प्रति असणारी निष्ठा दाखवून दिली.

रविकांत तुपकर हे मागील अनेक वर्षांपासून विदर्भामध्ये संघटना वाढीसाठी काम करत आहेत. पक्षामध्ये निर्माण झालेल्या यादवीच्या परिस्थितीत देखील त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्यात मिळवलेल्या यशामुळेच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याचं बोललं जातं आहे. तसेच येत्या काळात माढा मतदारसंघातुन लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यकार्यकारीणीची महत्वपुर्ण बैठक पुणे येथे 11 व 12 एप्रिल रोजी संपन्न् झाली. या कार्यकारीणीच्या बैठकीला राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येनी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत महत्वाच्या विषयावर मंथन करण्यात आले. आगामी 2019 च्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणूकांवर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेटृी यांनी स्वाभिमानीचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. या निवडीची खा. शेटृी यांनी घोषणा करताच सभागृहात टाळयांचा कडकडाट झाला. त्यांच्या निवडीचे उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले.