शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी निर्यातबंदी रद्द करा, उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

सातारा – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्याननंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच केंद्राने निर्यातबंदी लावल्याने भाव घसरला आहे. यामुळे कोंडीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक आमदार, खासदारांनी भूमिका घेतली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही कांदा निर्यातबंदीवरून नाराजी व्यक्त केली आहे. कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी असून निर्यातबंदी रद्द करावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

“कांद्याचं उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यानी केलं. त्यामुळे देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे,”असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. बंगळुरू रोझ व कृष्णापुरम या जाती वगळून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनायाने बंदी घातली आहे. कांदा पावडरला या निर्यातबंदीतून वगळण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. तर शेतकऱ्यांचं मरण हेच मोदी सरकारच धोरण आहे का असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –