महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार आज केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईरानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारला.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय रेशीम बोर्डाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय रेशीम बोर्डचे अध्यक्ष हनमंत रायप्पा, वस्त्र मंत्रालयाचे सचिव राघवेंद्र सिंग, रेशीम बोर्डचे सदस्य सचिव श्री.ओखंडियार, एस.सी. पांडे, विशेष सचिव वित्त मंचावर उपस्थित होते.

जगभर रेशीम वस्त्रे पोहचविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सहकार्य करेल – सुषमा स्वराज

भारत देश हा जगात रेशीम वस्त्रे आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. आजही जगात रेशीम वस्त्रांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आवश्यक सर्व सहकार्य देईल, असे आश्वासन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी याप्रसंगी दिले.

श्रीमती स्वराज म्हणाल्या, रेशीम धाग्यातच इतकी क्षमता आहे की, जागतिक बाजारपेठ आजही सहज उपलब्ध होईल. आता तर महिलांना धागा काढण्यासाठी होणाऱ्या शारिरिक त्रासापासूनही वस्त्रोद्योग मंत्रालयाने मुक्तता दिली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठ भारताची वाट बघत आहे, परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक असणारे सर्व सहकार्य पुरविले जाईल, असा पुनरोच्चार श्रीमती स्वराज यांनी यावेळी केला. श्रीमती स्वराज यांनी त्यांचे रेशीम साडीविषयी व्यक्तिगत अनुभवही यावेळी सांगितले.

2020 पर्यंत महिलांना शारिरीक त्रासापासून मुक्तता मिळेल – श्रीमती ईरानी

टसर धागा काढण्यासाठी महिलांना त्यांच्या जांघाचा वापर करावा लागतो. वर्ष 2020 पर्यंत या शारिरीक त्रासापासून भारतातील सर्वच  महिलांना मुक्तता मिळणार असल्याची घोषणा श्रीमती ईरानी यांनी यावेळी केली. वस्त्रोद्योग मंत्रालयाने टसर धागा काढण्याचे तंत्र विकसीत केले असून प्रातिनिधीक स्वरूपात सहा राज्यातील महिलांना या मशीनचे वितरण आज कार्यक्रमात करण्यात आले.

ही मशीन सर्वच टसर धागा काढणाऱ्या देशभरातील महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रीमती ईरानी यांनी यावेळी जाहीर केले.

महाराष्ट्राचा विशेष उल्लेख

महाराष्ट्रात रेशीम हा अपरपंरागत व्यवसाय असून देखील महाराष्ट्र रेशीम शेती उद्योगात अतुलनीय योगदान देत आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्याला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल राज्याचे विशेष अभिनंदन श्रीमती ईरानी यांनी यावेळी केले.

रेशीम शेती उद्योग वाढीसाठी राज्यशासन प्रयत्नशील – श्रीमती बानायत

पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत संचालक श्रीमती भाग्यश्री बानायत म्हणाल्या, रेशीम शेती उद्योग वाढीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्याचा परिपाक म्हणून आज हा पुरस्कार राज्याला मिळाला.

राज्य शासनाने रेशीम शेती उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी नावीण्यपूर्ण उपाययोजना आखल्या आहेत यामध्ये रेशीम रथ यात्रा स्पर्धा घेऊन उत्कृष्ट रथाला पुरस्कार दिला जातो. रेशीम शेती उद्योगावर आधारित कॅलेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये रेशीम शेतीविषयी़ हंगामविषयी, नैसर्गिक वातावरणाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. यासह रेशीम शेती उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना विभागामार्फत अनुदान तसेच प्रशिक्षण दिले जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

रेशीम शेती उद्योगाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठाशी करार करून विद्यार्थ्यांना रेशीम शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यासह रेशीम शेती उद्योग टिकून राहावा आणि यातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दूरगामी धोरणही राज्य शासन आखत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रेशीम शेती उद्योगाला कृषी दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न

रेशीम शेती उद्योगाला पूर्ण कृषी दर्जा मिळण्यासाठी समिती नेमली असून यामध्ये तज्ञ, कृषी विद्यापीठातील कुलगुरू, अनुभवी अधिकारी यांचा समावेश असून येत्या काही दिवसात प्रस्ताव मंत्रालयाकडे मांडण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बानायत यांनी दिली. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास इतर शेतकऱ्यांना मिळणारे सर्वच लाभ रेशीम शेती करणाऱ्यांनाही मिळतील.

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.