खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या, शरद पवार यांनी केली मागणी

शरद पवार

मुंबई – गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.

यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त करत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संबंधित खात्याचे केंद्रीय केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.

‘खरीप हंगाम दारात असतानाच खतांमध्ये दरवाढ करण्याच्या दुर्दैवी निर्णयामुळे उत्पादन शुल्क आणि शेतीवर मोठा विपरीत परिणाम होईल. टाळेबंदीने मार्केटचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन, इंधन दरवाढ अशा संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा,’ अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –