१८९ सामने खेळल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्माने केली अशी कामगिरी

गुवाहाटी। भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारी (21 आॅक्टोबर) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने शतके करत महत्त्वाचा वाटा उचलला.

या बरोबरच रोहितने या सामन्यात एक खास गोष्ट केली आहे, जी त्याला मागील 188 सामन्यात करता आली नाही. रोहितने विंडीज विरुद्ध पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये शतक केले आहे.

रोहितने या सामन्यात 117 चेंडूत नाबाद 152 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 8 षटकार मारले आहेत. हे रोहितचे वनडेमधील 20 वे आणि विंडीज विरुद्धचे पहिले शतक ठरले आहे.

याआधी रोहितची विंडीज विरुद्ध वनडेमध्ये 95 धावा ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. ही खेळी त्याने 2011 मध्ये अहमदाबाद येथे केली होती. तसेच 2011 मध्ये त्याने विंडीज विरुद्ध नाबाद 90 धावाही केल्या होत्या. पण त्याला शतक करण्यात अपयश आले होते.

असे असले तरी रोहितने विंडीज विरुद्ध कसोटीत मात्र दोन शतके केली आहेत.