सांगली : कोल्हापूर आणि सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आजचं चक्काजाम आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र कोल्हापूर आणि सांगलीत बंद मागे घेतला असला तरी इतर जिल्ह्यात बंद सुरूच राहणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यावर्षी ऊस दराच्या मागणीवरून केलेल्या आंदोलनावर आणि नंतर घेतलेल्या माघारीच्या भूमिकेवर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यावर्षीच ऊस दराचे आंदोलन ही स्टंटबाजी असल्याचा आरोप करत लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही आंदोलने सुरू असल्याचं खोत यांनी म्हटलं आहे. या ऊस आंदोलनात दम नव्हता. रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेत मुख्यमंत्री यांनी एफआरपीचा पैस वसूल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा केली होती. यासाठी वेळ पडली तर सरकार कारखानदाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होते .राज्याच्या मुख्यमंत्र्यानी हे आश्वासन देऊन देखील 2-3 दिवस हे आंदोलनाचे नाटक कुणासाठी आणि कशासाठी केलं? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.