मुंबई : सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला. 22 जानेवारीला विषप्राशन केल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं, मात्र त्यांना धर्मा पाटील यांच्याबाबतीत खरंच काही माहिती होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी सरकारवर निशाना साधताना आपल्या अज्ञानाच अक्षरशः प्रदर्शन मांडलं आहे . ”महाराष्ट्रातील शेतकरी धर्मा पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंत्रालयात विषप्राशन केलं. मात्र या सरकारने त्यांना वाचवलंही नाही आणि कसली मदतही केली नाही. त्यांना मरु दिलं.दरम्यान मुख्यमंत्री दावोस ला गेले आणि रिकाम्या हाताने परतले,” असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं.
वस्तुस्थिती काय आहे ?
शिंदखेडाचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील यांच्या मालकीची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतली. मात्र, यासाठी सरकारी भावाने पैसे देण्यात आले. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील गेली दोन वर्ष लढा देत होते. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारकड़े जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून पाठपुरावा करुन निराश झालेल्या आणि विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज देताना रविवारी रात्री अखेर त्यांची प्राणज्योत जेजे रुग्णालयात मालविली.
या बेजबाबदार ट्वीटमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत . सरकारवर टीका करताना पाटील यांनी आत्महत्या का केली याची प्राथमिक माहिती घेण्याची तसदी निरुपम यांनी का घेतली नाही ? पाटील यांचा मृत्यू हा निरुपम आणि राजकारणी मंडळींसाठी फक्त सरकारवर टीका करण्याचा मुद्दा आहे का ? पाटील यांच्या मृत्युनंतर निरुपम आणि राजकारण्यांकडून दाखवलेली जात असलेली सहानभूती ढोंग आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
You must be logged in to post a comment.