पुणे : पुण्याची लोकसभेची जागा प्रत्येक निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी या ना त्या कारणाने येत असते. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. कॉंग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या अश्या या जागेवर राष्ट्रवादीने आपला हक्क सांगत राजकीय रस्सीखेच स्पर्धेला सुरुवात केली आहे.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने केलेली कामे, पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेलं काम पाहता ही जागा आपल्याकडेच असावी असं कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी देखील मागणी काकडे यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले अंकुश काकडे ?
राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा मतदार संघांचे सर्वेक्षण केलेले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने केलेली कामे, पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेलं काम आणि शहरात वाढलेली आमची ताकत पाहता ही जागा आपल्याकडेच असावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पवार साहेबांना मतदान करणे हे आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं भाग्य असून दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत आम्ही विषय नक्की मांडू.