कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी (कर्जमाफी) आलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. त्याच्या याद्या तात्पुरते मंजूर, अधिक माहितीसाठी प्रलंबित, तात्पुरते नामंजूर आणि विचाराधीन अर्जदार अशा चार गटांमध्ये विभागल्या जाणार आहेत. दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या ग्रामसभांमध्ये त्यांचे वाचन होईल.

प्रत्येक गावाला खास एक कर्मचारी असणार आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तालुकास्तरीय समितीला या याद्या देण्यात येतील. एखादा अर्ज फेटाळला तर त्याला प्रांताच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उपविभागीय अधिकारी समितीकडे अपील करता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होईल. कर्जमाफी अर्जात सादर केलेल्या मोबाइल क्रमांकावर अर्जावरील प्रक्रियेचे अपडेट्स शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकरी कुटुंब कर्जमाफी असल्याने ज्या शेतकऱ्यांनी स्वत:, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुलांच्या नावाने स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत, हे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. या तिघांचा मिळून एकच अर्ज सादर होणे अपेक्षित आहे. अपात्र झालेल्या अर्जदारांना दुरुस्तीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

चालू कर्ज खातेदारांना आणखी फटका

जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने २०१६-१७ मध्ये कर्ज घेतलेल्या चालू खातेदारांना कर्जमाफीने मोठा आर्थिक झटकाच दिला आहे. ज्या चालू कर्ज खातेदारांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत घेतलेल्या कर्जाची फेड केली, त्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. जे शेतकरी यापूर्वी चालू कर्ज खातेदार आहेत, परंतु त्यांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत परतफेड केली नाही, त्यांना मात्र या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा बँकेचे २५ हजार चालू कर्ज खातेदार यामुळे वंचित राहण्याची शक्यता आहे.