हरभरा पिकावर रोगराईचे थैमान !

शेवगाव / निवृत्ती नवथर : दरवर्षी लाखो रुपयांचा मातीत जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्याला कधी नैसर्गिक संकट तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे नेहमीच पराभवाचा सामना करावा लागतो. गेल्यावर्षी हरभरा पिकाने हातभार लावल्याने यंदा शेतकऱ्यांंनी खूप अपेक्षेने व मोठा खर्च करून हरभरा पेरण्या केल्या मात्र पिक हाताशी येताच ‘मळकूज’ या रोगाने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर यंदाही विरजण पडले आहे.

गेल्या काही हंगामापासून शेतकऱ्यांचा ऊस, कांद्याबरोबरच हरभरा या रब्बी कडधान्याकडे कल वाढला आहे. मागच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा पिक घेतले होते. त्यावेळी निसर्गानेही चांगली साथ दिल्याने उत्पादनही प्रचंड झाले होते. याशिवाय सुमारे 6 ते 7 हजार रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी भाव हाती सापडल्याने अडचणीतील शेतकऱ्याला हरभऱ्याने चांगलेच तारले होते. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला प्राधान्य दिले.

मुबलक पर्जन्यमान तसेच पोषक वातावरण असल्याने रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पेरण्या लक्षवेधी झाल्या होत्या. जिल्ह्यात हरभऱ्याचे सुमारे 63 हजार 795 हेक्टर सरासरी क्षेत्र असताना सुमारे 53 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभरा पेरण्या केल्या होत्या. प्रारंभी पोषक वातावरण असल्याने हरभऱ्याची चांगल्याप्रकारे उगवण झाली. गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही चांगले उत्पादन होईल, व उत्पन्नही वाढेल, असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी खते, औषधे, खुरपणी इत्यादीसाठी मोठा खर्च केला.

परंतु, शेतात हरभरा डौलात उभा असतानाच बुरशी व विषाणूंचा त्यावर प्रादुभाव दिसू लागता होता. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी वेळोवेळी फवारणी, मशागत करून पिकाचे संगोपन केले. परंतु, बुरशीतून भयावह असलेल्या मुळकूज रोगाने अल्पावधीतच हरभऱ्यावर थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. खरतरं, पिकांवरील बुरशीजन्य रोग हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी असतो. जमिनीतून योग्य वेळी पाण्याचा निचरा न झाल्यास झाडाची मुळे कुजतात व सडतात, त्यामुळे मुळाव्दारे झाडाला अन्न पदार्थ व इतर पोषक घटके पोहचू शकत नाहीत. तसेच झाडाला ऑक्सिजन मिळत नाही, परिणामी, झाडाची वाढ खुंटते, झाड सुकते तसेच शेंडा आखडतो व बघता बघता हा मुळकूज पिकांना नेस्तनाबूत करतो.

या प्रकारे जिल्ह्यातील शेवगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकांवर मुळकूजचा प्रादुर्भाव दिसून येतो. या तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच काही प्रमाणात हाती येणाऱ्या पिकांचे उत्पन्न या रोगामुळे प्रचंड प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही फिटेतो की नाही ? याची शाश्वती राहिलेली नाही.

दरम्यान, एकीकडे इतर पिकांच्या तुलनेत हरभऱ्याला  चांगला भाव असल्याने शेतकर्याने या पिकांमधून खूप स्वप्न रंगवली होती. परंतु नैसर्गिक संकटामुळे पिके हातातून जावून शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहेत.