नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट- नवाब मलिक

मुंबई – नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा हा पब्लिसिटी स्टंट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. शिवसेनेने आज नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी सडकून टिका केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत आज नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याचे सांगितले. अधिसूचना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळात न्यावा लागतो. नंतर त्याबाबत निर्णय घेतला जातो. तो अशा पद्धतीने खुल्या मंचावर रद्द करता येत नाही असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेवर केला.

शिवसेनेने आज नाणारबाबत जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका समृद्धी महामार्गाबाबत घेणार का ? असा सवाल करतानाच या प्रकल्पाच्या निर्णय प्रक्रियेतही शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग आहे. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेची भूमिका काय हेही स्पष्ट व्हायला हवे असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले.