भित्रेपणा लपविण्यासाठी शिवसेनेने फक्त अग्रलेखच लिहावेत: ओवेसी

‘शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून आहे. हा भित्रेपण लपविण्यासाठी मग शिवसेनेचे नेते फक्त वृत्तपत्रात अग्रलेख लिहित बसतात’, अशा शब्दांत ‘एमआयएम’चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (शनिवार) टीकास्त्र सोडले. ‘अग्रलेख लिहिणे बंद करून शिवसेनेने मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी’, असे आव्हानही ओवेसी यांनी दिले.

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना नेते संजय राऊत आणि ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. ‘ओवेसी यांनी स्वत:ला हैदराबादपुरतेच मर्यादित ठेवावे. राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे; हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही! ओवेसी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या नावाखाली मुस्लिम समुदायाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. भविष्यात त्यांना याचा फटका बसेल’, असे विधान राऊत यांनी केले होते.

Loading...

त्यावर ओवेसी यांनीही प्रत्युत्तर दिले. ‘शिवसेना मोदी यांना घाबरते. त्यामुळे केवळ अग्रलेखच लिहिले जातात. आता अग्रलेख लिहिणे सोडून त्यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. माझे पूर्वजही भारतीयच होते, हे मी सिद्ध करू शकतो’, असे ओवेसी म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्यावर राऊत यांनी भाजपवर टीका केली. ‘तोंडी तलाक आणि एससी-एसटी कायद्यातील तरतुदींबाबत केंद्र सरकार अध्यादेश लागू करू शकत असेल, तर राम मंदिराच्या प्रश्‍नावर हा मार्ग का अवलंबिला जात नाही? आज संसदेत सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. 2019 मध्ये काय स्थिती असेल, माहीत नाही. राम मंदिर हा जनभावनेचा विषय असल्यामुळे त्यावरील तोडगा न्यायालयात निघू शकत नाही. हा राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे आणि पंतप्रधान मोदी हा निर्णय घेऊ शकतात’, असे राऊत म्हणाले.

Add Comment

Click here to post a comment
Loading…