धक्कादायक ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात एकूण ८ हजार बालके कोरोना बाधित

कोरोना

बीड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले असताना आता संभाव्य तिसरी लाट देखील आली की काय, जिल्ह्यात एकूण ८ हजार बालके कोरोनाबाधित आढळल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाच अधिक धोका असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. तज्ज्ञांचे मत विचारात घेता टास्क फार्स स्थापन करून खाटाही राखीव केल्या जात आहेत. तिसरी लाट येण्यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच जिल्ह्यात ० ते १८ या वयोगटातील ८ हजार बालकांना कोरोना झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला होता. आता दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली आहे. तिसऱ्या लाटेने मात्र जिल्ह्याच्या उंबरठ्यावर आल्याचे दिसत आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठांना तर दुसऱ्या लाटेत तरुणांना अधिक संसर्ग झाल्याचे सार्वत्रिक चित्र होते. आता ज्येष्ठांचे व तरुणांचे काही प्रमाणात लसीकरण झाले असून एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार २५ टक्क्यांहून अधिक नागरिकांत हर्ड इम्युनिटी म्हणजेच कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनापासून बचावलेल्या बालकांना आता संसर्गाचा अधिक धोका असल्याने तिसऱ्या लाटेत बालकांचे प्रमाण अधिक असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच १ जानेवारी ते २३ मे या कालावधीत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ७ हजार ९८५ बालके बाधित झाली आहेत. दुसऱ्या लाटेतील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण १० टक्के आहे. बालकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी पालकांनीच आधी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण बालकांना पालकांपासून संसर्गाचा धोका असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन आंधळकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ हे ब्रीद घेऊन पालकांनी यापुढे वागणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या –