राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन – मुख्यमंत्री

जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी ४,७०० कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्राचे आभार मानले.

राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची ५ वी बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह,भूपृष्ठ व रस्ते वाहतूक तथा सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग मंत्री नितीन गडकरी, अन्य केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या बैठकीत विविध विषयांवरील सादरीकरण करुन राज्याच्या कामगिरीची माहिती दिली.