…म्हणून फडणविसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर ‘लोक माझे सांगाती‘ या आत्मचरित्रातील ‘तो’ उताराच वाचून दाखविला

फडणवीस आणि पवार

मुंबई- कोरोना महामारीच्या काळातही महाआघाडी सरकारने गैरकारभाराचा कळस गाठला आहे. अशा सरकारला बांधावर, रस्त्यावर उतरून वठणीवर आणू , असा निर्धार माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीचा समारोप करताना काल फडणवीस बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे ,आ. सुजितसिंह ठाकूर तसेच पक्षाचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की , नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकरी आणि कामगार वर्गाच्या कल्याणासाठी केलेल्या कायद्यांना काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष केवळ राजकीय हेतूंनी विरोध करत आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना 2006 मध्ये महाराष्ट्रात कंत्राटी शेतीला परवानगी दिली गेली होती. आता हाच काँग्रेस पक्ष कृषी कायद्यांना विरोध करण्याची भाषा करतो आहे. शेतकऱ्यांना या कायद्यांची माहिती पोहचविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती ‘ या आपल्या आत्मचरित्रात शेतकऱ्यांवरील बंधने काढून टाकण्यासंदर्भात व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनाचा उतारा फडणवीस यांनी यावेळी वाचून दाखविला. आमचे सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांचे नाव घेत वारंवार रस्त्यावर उतरायचे. 2006 मध्ये महाराष्ट्राने कंत्राटी शेतीला परवानगी दिली होती. आता हेच काँग्रेस , राष्ट्रवादी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. आता काँग्रेस – राष्ट्रवादीची मंडळी दुटप्पीपणे या कायद्याला विरोध करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सामान्य माणूस महाआघाडी सरकारच्या कारभाराला पुरता वैतागला आहे. लॉकडाऊन काळात या सरकारने एका दमडीचीही मदत सामान्य माणसाला केलेली नाही.

या सरकारच्या गैरकारभाराचे , भ्रष्टाराचाराचे पुरावे आमच्याकडेही येत आहेत. योग्य वेळी हे पुरावे जाहीर करू. मंदिर उघडण्यास परवानगी न देणारे सरकार दारूची हॉटेल उघडण्यास परवानगी देत आहे. अशा कारभारामुळे महाराष्ट्राची बदनामी होते आहे. लॉकडाऊन काळात राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. राज्यातला सामान्य माणूस त्रस्त असताना, लोक किडा, मुंगीसारखी मरत असताना राज्यकर्त्यांना झोप कशी येते, असा सवालही फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –