जिल्ह्यात आत्तापर्यंत २७ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

औरंगाबाद – जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला असून आत्तापर्यंत जवळपास ४ लाख ४७ हजार ३३४ नागरिकांनी लस घेतली आहे. त्याची सरासरी २७ टक्के इतकी आहे. मनपाने तातडीने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांमुळेच एवढ्या गतीने लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात शासन निर्देशान्वये शहरात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याने देखील लसीकरणाचा वेग वाढला आहे.

केंद्र सरकारने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात केली. सुरूवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, जेष्ठ नागरिक त्यानंतर ४५ वर्षावरील नागरिक आणि १८ वर्षावरील नागरिकांचे टप्याटप्प्याने लसीकरण सुरू झाले. जानेवारी ते मार्चपर्यंन्त लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर एप्रिल महिन्यात दुसर्‍या लाटेने जोर धरल्यामुळे लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. लसीचा पुरवठा होत असल्याने नागरिक देखील लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ लागले.

मात्र आता १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात होताच लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली. ८० केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जाऊ लागली. दररोज १२ ते १७ हजार दरम्यान लसीकरण होऊ लागले. आजवर ४ लाख ४७ हजार ३३४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शहराची एकूण लोकसंख्या अंदाजे सुमारे १७ लाख इतकी गृहित धरली असून लोकसंख्येच्या तुलनेत सरासरी २७ टक्के एवढे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

पालिकेकडून केल्या जाणार्‍या लसीकरणात लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आजवरच्या लसीकरणामध्ये सरासरी १ टक्के इतकी लस वाया जात होती. आता हे प्रमाण ०.३३ टक्के एवढे नगण्य आहे. केंद्रावर दहा व्यक्ती आल्याशिवाय लस दिली जात नाही. त्यामुळे लस वाया जाण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –