पावसाचा मराठवाड्यात ब्रेक, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

 टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सर्वत्र अतिवृष्टीचे सावट आहे मात्र मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने ब्रेक लावल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे.

जूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. जुलै महिन्याला सुरवात झाली असून पावसाने अजूनही मराठवाड्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात 49 लाख 11 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्या तुलनेत 17 लाख 87 हजार हेक्टरची पेरणी झाली आहे.

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात निम्मी पेरणी आटोपली असतांना जालना, परभणी, लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अजून प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत 30 टक्केही पेरणी झालेली नाही. औरंगाबाद मध्ये 41 टक्के, तर बीड जिल्ह्यात 35 टक्के पेरणी झाली आहे.