खापरी गाव पुनर्वसनाच्या कामाला गती द्या – सुनील केदार

सुनील केदार

नागपूर – मिहान प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या खापरी गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कार्यवाही गतीने करावी. तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी उद्योजकांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिल्या.

खापरी (रेल्वे) पुनर्वसनाच्या अनुषंगाने मिहान येथील डब्ल्यू बिल्डींगच्या सभागृहात श्री.  सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, मेघा मानकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, मिहानचे भूसंपादन व पुनर्वसन सल्लागार प्रकाश पाटील, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, प्रभारी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन हेमा बडे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी यावेळी उपस्थित होते.मिहान प्रकल्पग्रस्त इतर गावांमध्ये लावलेल्या निकषानुसार खापरी गावातील प्रकल्पग्रस्तांना भूखंड वितरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकरी खातेधारकांना आणि बिगर शेतकरी खातेधारकांना भूखंड वितरीत करण्याचे नियोजन करावे, असे श्री. सुनील केदार (Sunil Kedar) यांनी सांगितले. तसेच खापरी येथील म्हाडा कॉलनीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मिहानमधील उद्योगांमध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. यासाठी सर्व उद्योजकांसोबत लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी मिहानच्या अधिकाऱ्यांना दिल्या. खापरी पुनर्वसनाच्या अनुषंगाने प्रलंबित बाबींचा आढावा घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.

महत्वाच्या बातम्या –