बेलगंगा साखर कारखाना – खरीददार कंपनीकडून गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू

चाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्याने हा कारखाना घेणा-या कंपनीने तो सुरू करण्याच्या जोरदार हालचालीस प्रारंभ केला आहे. यासाठी देखभालीअंती चाचणी हंगाम घेतला जाणार आहे.
चार स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येत अंबाजी ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील, व्हाईस चेअरमन रवींद्र्र केदारसिंग पाटील, नीलेश निकम, डॉ. अभिजित पाटील यांनी मात्र आठ वर्षांपासून बंद असलेला बेलगंगा कारखाना विकत घेऊन तो सुरू व्हावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी न्यायालयाने कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठवल्याने ऊस उत्पादकांसह सभासद व कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चित्रसेन पाटील यांनी गुंतवणूकदारांशी संवाद सुरू केला असून कारखान्याचे मेन्टनस करून ट्रायल सिझन घेण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंत्रे बंद असल्यामुळे कारखान्याचे मेन्टनस करावे लागणार असून यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मेन्टनस झाल्यानंतर ट्रायल सिझन घेणे शक्य होईल. याचबरोबर भांडवल उभारणीस तीन ते चार महिने लागतील, अर्थात पुढच्या गळीत हंगामात कारखान्याची यंत्रे निश्चितपणे धडधडतील, अशी आशा आहे. कंपनी स्थापन करून सर्वसामान्यांकडून शेअर्सरूपाने बेलगंगा कारखान्याची खरेदी करण्यासाठी पैसा उभा केला जात आहे. कारखान्यावर जिल्हा बँकेसह इतर अशी ८० कोटींहून अधिक देणी आहे.
जल्हा बँकेला या व्यवहारापोटी ३९ कोटी २२ लाख रुपये अदा करावयाचे आहेत. यासाठी गुंतवणुकदारांकडून भांडवल उभारले जात आहे.
चाळीसगाव तालुक्यात ऊसाचे मोठे लागवड क्षेत्र आहे. बेलगंगेसाठी लागणा-या ३ लाख मेट्रीक टन ऊसा नंतरही ऊस शिल्लक राहतो. बेलगंगेत एका हंगामात अडीच लाख मेट्रीकटन ऊसाचे गाळप होते. यामुळे १०० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होऊन ऊसतोड मजूर व पाचशेहून अधिक कामगारांना हक्काचा रोजगारही मिळतो. सद्यस्थितीत तालुक्यात पाच लाख मेट्रीक टन गाळप होईल, एवढा ऊस उपलब्ध आहे.
आमदार उन्मेष पाटील यांनी बेलगंगेचा मुद्दा तापवूनच राजकारणात एन्ट्री केली. मांदुर्णे ते गुढे या त्यांच्या पदयात्रेने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले. २०१४ ची विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली. त्यानंतर चित्रसेन पाटील यांच्यासह त्यांच्या तीन सहका-यांनी कारखाना विकत घेतला. त्यामुळे येत्या काळात तालुक्याच्या राजकारणाची समीकरणे नव्या बदलाच्या उंबरठ्यावर येतील असा मतप्रवाह आहे.