शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ

टीम महाराष्ट्र देशा : महिन्याचं कडक रखरखतं ऊन, अधिग्रहित जमीनींमध्ये झालेली फसवणुक, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ठासून भरलेला असंतोष आणि सत्ताधार्यांचा दबाव झूगारुन आलेल्या बळीराजाच्या साक्षीनं पुन्हा “धर्मा पाटील होऊ देणार नाही” हा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रदिनी व्यक्त केला.

धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातीलऔष्णिक प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून खासदार शेट्टी यांनी भाजप सरकारविरोधातला यल्गार पुकारला.

‘मी आत्महत्या करणार नाही’, “मी लढणार आहे” असा संदेश देण्यासाठी ही यात्रा असल्याचं संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील या अभियानात सहभागी झाला आहे.

सरकारची तिजोरी दिवसाढवळ्या लुटणार्या एजंट आणि मंत्री जयकुमार रावल यांच्यावर धर्मा पाटील यांच्या आत्महत्याप्रश्नी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी केली. प्रकल्प होणाऱ्या ठिकाणी जमीनी बळकावण्यासाठी मंत्री, प्रशासन, दलालांची टोळी कार्यरत असल्याचं धर्मा पाटील यांच्या निमित्तानं समोर आल्याचं खासदार शेट्टी यावेळी म्हणाले.

याआधीच्या आणि आताच्या सरकार या व्यवस्थेनं शेतकऱ्यांची फसवणूक केलीय. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे अभियान सुरू केलंय. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

शेतकऱ्यांनो कर्ज झालं तरी लाज वाटून घेऊ नका, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील साडेपाच लाख कोटी रुपयांचं कर्ज हे आत्तापर्यंतच्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिपाक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दबाव तयार करण्यासाठी देशातल्या १९५ शेतकरी संघटनेची वज्रमुठ देशपातळीवर बांधली आहे, त्यामुळे सातबारा कोरा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही खासदार शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारी खरेदी केंद्राचा बट्ट्याबोळ सुरु आहे, तुरीचे चुकारे मिळालेले नाहीत,नऊ अध्यादेश काढूनही कर्जमाफी नीटपणे राबू शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, मात्र सरकार गंभीर नाही,अशी टीका खासदार शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसांठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी संघटनेच्या अभियानाला शेतकऱ्यांनी जाऊ नये म्हणून भाजप आणि मंत्री जयकुमार रावल यांनी पोलीसांच्या माध्यमातून दबाव आणल्याचा आरोप स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले.

शेतकरी सन्मान्न अभियान राज्यातल्या दहा जिल्ह्यांमध्ये तब्बल २००० किमी प्रवास करून नऊ मे रोजी उस्मानाबाद येथे अभियानाची सांगता होणार आहे.