राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी – राजू शेट्टी

राजू शेट्टी

सोलापूर – सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या १ दिवसाच्या दौऱ्यामध्ये ते अक्कलकोटमधील गावांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर शेतीचं झालेलं नुकसान बघावं आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली जात आहे.

अतिवृष्टी होऊ नये ही माझी प्रार्थना करत आहे. पंचनामे सुरू आहे. माहिती घेत आहे. माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर ‘राज्याची थकीत येणी जर केंद्राकडून वेळेत आली तर मदतीसाठी हात पसरावे लागणार नाहीत. केंद्राने विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दुजाभाव करू नये’ असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, ‘राज्य सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यास प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी नाराज होऊन जीवाचं बरं-वाईट करू नये’ असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. सरकार साखर कारखानदारांना मदत करण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना तातडीने थकहमी देते. मग, शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता का? असा सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला आहे. राजू शेट्टी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची आर्थिक मदत करा अन्यथा आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –