पीक विमा योजनेतील नफेखोरी थांबवा – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी नीती आयोगाशी उत्तम समन्वय ठेवून पावले उचलली जातील असा विश्वास देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,  राज्याच्या  महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये केंद्राचे अधिक सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. जीएसटी परतावा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कांजूर मार्ग मेट्रो डेपो, धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन मिळणे, दिघी बंदर  विकास, संरक्षण खात्याशी संबंधित जमीन विकासाचे मुद्दे अशा ४१ विषयांवर सह्याद्री अतिथीगृह येथे नीती आयोगाशी विस्तृत चर्चा करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे आयोगाच्या सदस्यांनी या विषयांना तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असे आश्वस्त केले. यावेळी नीती आयोगाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणि कोविड संसर्ग रोखण्यात महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसाही केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की , नीती आयोगाच्या सदस्यांनी जो आपलेपणा दाखवून विकासासंदर्भात सूचना केल्या आहेत त्याचे आपण स्वागत करतो, आणि यापुढील काळात राज्य सरकार आयोगाशी सातत्याने समन्वय ठेवून  मार्गदर्शन घेत जाईल.

कोविड काळातील कामासाठी कौतुक

यावेळी कोविड संसर्ग रोखण्यात महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली असल्याची प्रशंसा आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, या संपूर्ण काळात आरोग्य सुविधा वाढविण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. रुग्णसंख्या जास्त होती, मात्र आता तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती असल्याने उभारलेल्या सुविधांवर देखभालीचा खर्च सुरूच राहणार असल्याने, केंद्राने कोविड अनुदान राज्याला पूर्ण मिळेल असे पाहावे.

जीएसटी, इंधनावरील सेस याकडे लक्ष वेधले

जीएसटी परताव्याची राज्याला मिळणारी थकबाकी ३० हजार कोटींवर पोहोचली असून येत्या काही काळात ती ५० हजार कोटींवर पोहोचेल. पेट्रोल आणि डिझेलवरील वाढवलेल्या सेसच्या माध्यमातून केंद्र सरकारनं उत्पन्न मिळवलं, पण राज्याला त्याचा काही फायदा झाला नाही याकडेही मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे लक्ष वेधले.

पीक विमा योजनेतील नफेखोरी थांबवा

पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा कंपन्यांना प्रचंड नफा होत आहे याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले की, यावर नीती आयोगाने गांभीर्याने काही पर्याय काढण्याची गरज आहे. यावर उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी यासंदर्भात सर्वच राज्यांकडून तक्रारी येत असून लवकरच शेतकऱ्यांना फायदा होईल अशा पर्यायावर गांभीर्याने  विचार सुरु असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –