ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करणार – नितीन राऊत

नितीन राऊत

नागपूर – लसीकरणाविषयी  ग्रामीण भागासोबतच आदिवासी समाजात गैरसमज असल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरण हाच कोरोना प्रतिबंधाचा मार्ग आहे. देवलापार, पारशिवणी भागातील लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत त्या भागाचे प्रतीनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज ग्रामपंचायत कट्टा (तालुका देवलापार) येथे केले. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे, नाना कंबाले, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकार, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील कोविडबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र, देवलापार ग्रामीण रुग्णालय, कट्टा ग्रामपंचायत, चारगाव, पारशिवणी ग्रामीण रूग्णालय येथे भेट देऊन आढावा घेतला.

कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वाढ करणे. तसेच सुसज्ज अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राव्दारे 62 टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश चौधरी यांनी दिली. त्यानंतर त्यांनी देवलापार येथील रूग्णालयाला भेट दिली. डॉ. शमीम अख्तर यांनी कोविडविषयक आरोग्य सेवांची माहिती दिली. पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार दुर्गम व आदीवासी भागात असलेल्या या ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.108 क्रमाकांच्या रूग्णवाहीकेविषयी असलेल्या तक्रारी बघता सुसज्ज अत्याधुनिक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वस्त केले. आदिवासी भागात काम करण्यास डॉक्टर उत्सुक नसतात त्यासाठी त्यांना वाढीव भत्ता देण्याच्या प्रस्तावासोबत 100 बेडच्या नवीन सुसज्ज इमारत तयार करण्यासाठीचा प्रस्ताव शल्य चिकीत्सक यांनी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांना प्राधान्य देऊन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यावर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.

माझे – कार्यक्षेत्र – माझी जबाबदारी, यानुसार पदाधिकारी व अधिकारी यांनी  समन्वयाने काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना विषयक पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.कोविडची लक्षणे आढळताच वेळकाढूपणा न करता  टेस्ट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पारशिवनी येथील मुलांचे शासकीय वसतीगृह पारशिवनी येथे सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणाची सज्जता व पदाधिकाऱ्यांशी संवाद करण्यासाठी पालकमंत्री डॉ.राऊत यांचा आजचा हा दौरा होता. या संपूर्ण दौऱ्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा व सूचना त्यांनी नोंदवून घेतल्या. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याने यासाठी आणखी नियोजन व काळजी घेण्याची गरज आहे. कारण या लाटेत बालकांसोबत त्यांच्या मातांनाही काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत राहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाव्दारे लहान मुलांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पेडीयाट्रीक कोरोना सेंटरच्या उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लसीकरणात माघारलेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे दौरे सुरू आहेत. ग्रामीण रूग्णालयात 50 ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. देवलापार येथील आढाव्यात प्रत्येक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका देण्याचा मनोदय पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.अन्य काही आरोग्य यंत्रणेच्या मागण्या असल्यास त्या प्रशासनाकडे नोंदवाव्यात. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये कोविडसंबधी सुविधा उभारण्यात प्रशासन युध्दपातळीवर कार्यरत आहे. 600 बेड वरून 9000 पेक्षा जास्त बेडची निर्मीती करण्यात आली आहे. ऑक्सीजन, रेमडेसिवीर, टॉसीझुमॅब या औषधांची वितरण व्यवस्था जिल्ह्यात उभारण्यात आली आहे. म्युकरमायकोसिसचे आव्हान आता आरोग्य यंत्रणेपुढे आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाला प्रतिसाद वाढवावा. यावेळी आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी सुचना केल्यात. ग्रमीण भागातील लसीकरणानंतर मृत्यु झालेल्या प्रकरणांची चौकशी करण्यात येईल. असे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले. कट्टयाचे सरपंच डॉ. सुधीर नाखले, देवलापारचे सरपंच शाहीस्ता पठाण यांनी व जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे, नाना कंबाले, संजय झाडे, संजय नेवारे, रवी कुमरे, कलाताई ठुंबरे, विजयसिंह यादव यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.      तसेच सध्या खरिपाचा हंगामा सुरू असल्याने शेतकरी बांधवांनी बी-बियाणे, खत खरेदीसाठी गर्दी करू नये,  असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –