‘ब्रेक द चेन’च्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

औरंगाबाद – शासनाच्या ‘ब्रेक द चेन’च्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात यावी. या अंमलबजावणीतून कोरोनाच्या प्रसारास अटकाव करावा, अशा सूचना जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतची बैठक श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात होतो आहे. यासाठी प्रशासनाने शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे यादृष्टीने विविध पथकांची जिल्ह्यात निर्मिती केलेली आहे. परिवहन विभागाने त्यांची दोन पथके तयार करावीत. या पथकांमार्फत कोविड 19 प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. रिक्षांमध्ये दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्या बसेस, खासगी टुर्स आणि ट्रॅव्हल्स  यांनीही शिष्टाचाराचे पालन करावे, याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यवाही करावी.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच पथके तैनात करावीत. तसेच कोविड 19 प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. तर शहरातील सर्व हॉटेल्स फक्त टेक अवे पद्धतीने चालू राहतील, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पथकांनी कारवाई करावी. तर अन्न औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी मेडिकल दुकानांवर केवळ औषधांचीच विक्री होईल याची दक्षता घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मेडिकल दुकानावर कारवाई करावी, अशा सूचनाही श्री.सत्तार व श्री.चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री.जाधवर यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर वाचन करून उपस्थित अधिकाऱ्यांना करावयाच्या कारवाईबाबत माहिती दिली. यावेळी श्री. गोंदावले यांनीही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत काही सूचना केल्या.

महत्वाच्या बातम्या –