सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प लागणार मार्गी !

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील रेंगाळलेली जलसिंचनाची कामे मार्गी लावण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली, यावेळी गिरीश महाजन यांनी सर्व प्रलंबित कामे आठवडाभरात मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.

गिरीश महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीला जलसंपदा आणि पाठबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी दुष्काळाने होरपळनाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगामी काळात दुष्काळी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण होणे गरजेचं असल्याचं मत सुभाष देशमुख व्यक्त केले.

यावेळी जिल्ह्यातील प्रकल्पांना गती मिळण्यासाठी भीमा-उजनी प्रकल्प, होटगी येथे म्हैस संशोधन केंद्र स्थापनेसाठी जलसंपदा विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळणे, वडापूर बॅरेजेसचा प्रस्ताव शासनास सादर करणे, भंडारकवठे व कुरघोट येथील चिबड जमीन सुधारणे, हिप्परगा तलाव परिसर पर्यटन खात्यास हस्तांतरण करणे याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सदरील विषय बैठकीत मांडले.  यावर गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत येत्या आठवडाभरात प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.