शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश – सदाभाऊ खोत

मुंबई : विविध शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आयात शुल्क वाढण्यास यश प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल, असे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क साडेबारा टक्क्यावरुन टक्के वरून साडेसतरा टक्के, रिफाईंड ऑइल 15 टक्क्यावरून 25 टक्के तसेच क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क 7 टक्क्यावरून 15 टक्के करण्यात आले आहे.

पिवळ्या मटारवर यापूर्वी आयात शुल्क नव्हते ते आता 50 टक्क्यापर्यंत वाढविले आहे. गहू आयातीवरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरुन दुप्पट करुन 20 टक्क्यापर्यंत नेले आहे. केंद्र शासनाने तूर, मुग व उडीद यावर असणारी निर्यात बंदी उठवली आहे. तूर आयातीवर केंद्र शासनाने दोन लाख टनापर्यंत निर्बंध लावला असून उडीद व मूग आयातीवर तीन लाख 50 हजार टनापर्यंत निर्बंध लादला आहे.

तूर, मुग, उडीद, कापूस, भात, ज्वारी, बाजरी , मका व सोयाबीन आदींच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये चालू वर्षी भरीव केली असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यात कृषी मुल्य आयोगाची स्थापना केल्यामुळे शेतमालाच्या दरासंदर्भात केंद्राशी समन्वय साधण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे, असेही खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.